रावसाहेब दानवे... मराठवाड्याच्या मातीशी नाळ जोडलेला नेता..!

'मी जालन्याच्या शाळेत जातो' हा रुस्तम अचलखांब यांचा धडा माझ्या बऱ्याच पुढच्या इयत्तेला होता. माझ्यापर्यंत येईपर्यंत दोनदा सिल्याबस बदलला. धड्यात वर्णन केलेल्या गावाचं वर्णन हे रूढार्थाने जालन्याच्या प्रत्येक गावखेड्याचं वर्णन होतं.  पहिल्या इयत्तेपासून गाव सोडून विदर्भातल्या शहरात शिकायला गेलो. पण माझ्या मराठवाडा प्रांतांबद्दलची नाळ तोडणं शक्य झालं नाही. पुस्तकात माझ्या जालना  जिल्ह्याचा उल्लेख आणि माझ्या गावासारखं हुबेहूब वर्णन असलेला मजकूर पुस्तकात अभ्यासाला येण्याची ती एकमेव घटना होती. त्याआधीही आणि त्यानंतरही आमची गावकी मांडण्याचा कोणत्याही छापील  दस्ताऐवजात प्रयत्न झाला नाही.

 त्या धड्यात वर्णन केलेलं गाव आणि गावाची रचना. गावाबाहेरचं मारुतीचं आणि देवीचं देऊळ आणि पाटलाच्या पडक्या वाड्यापासून ते मांगवाड्यातलं गंग्या मांगाचं झोपडं ही अशी हुबेहूब रचना त्या काळात रुस्तम अचलखांब यांनी चितारली. इतर प्रदेशातली भौतिक परिस्थिती झपाट्याने बदलून तिथल्या साहित्याला इतिहास ठरवत गेली. पण मी वाचलेला जालन्याच्या शाळेत जातो हा धडा आताआतपर्यंत माझ्या जिल्ह्याच्या भूगोलाशी दुर्दैवाने प्रामाणिक राहिला. काहीच बदललं नाही. आम्ही तेच होतो. 

रझाकारी जाळलेल्या आणि उरलेसुरले कौलं आणि कागदाचे गठ्ठे घेऊन उभ्या असलेल्या तहसीलं कचेऱ्या, चाळणी चाळणी झालेले मुख रस्ते, आणि गावागावाला जोडणारे खोलगट पांदण रस्ते. विटा मातीत बांधकाम झालेल्या प्रत्येक गावातल्या चारदोन शाळेच्या खोल्या, गावात क्वचित आढळणारी सिमेंटची घरं. फक्त कुड आणि गवताचे उतरते छप्परं असलेले बौद्धवाडे, रया गेलेले पाटलांचे वाडे अंगावर धावून येणाऱ्या गढ्या इतका ओबडधोबड जालना जिल्हा अन तितकेच ओबडधोबड माणसं. स्वतंत्र मिळण्याआधी मराठीतून शिक्षणच नसल्याने 60 च्या दशकाच्या आधीची ठार आंधळी पिढी. तिथून पुढच्या पिढया त्याच एका खोलीच्या किंवा एखाद्या पाटलाच्या गोठ्यात भरणाऱ्या शाळेत शिकलेल्या होत्या. 

या अज्ञानामुळे आम्ही काळाच्या फार मागे राहिलो. कर्तृत्ववान माणसं, मोठे राजकारणी, विचारवंत, साहित्यिक, सुधारक, क्रांतिकारक याबाबतीत आमची भूमी नेहमी वांझोटी होती. 

त्या वांझोट्या भूमीत स्वतःला सिद्ध करण्याचीही कोणाची इच्छा होत नव्हती, इतका समाज निरुत्साही होता. काँग्रेस नावाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या हातात कारभार असलेल्या एका मोठ्या घटकाने 'आम्हाला स्वतंत्र दिलं' या उपकाराच्या भावनेत तुमच्या पदरात जे टाकलं ते गुमान घ्या अशी सवय लावली. त्यांनी धरून उभे केलेले नेते आमच्या माथी मारले. कमालीची निरक्षरता असल्याने त्या समाजाला स्वाभिमान शिकवायला कोणी साहित्यिक, बंडखोर, विचारवंत नसल्याने आम्ही गपगुमान काँग्रेसमागे कशाचीच आशा न बाळगणारे मेंढरं बनून चालत होतो.

 काँग्रेसने कधीही पालक म्हणू  सख्खासारखी वागणूक देऊन आमचं बोट धरून पुढे न्यायचा प्रयत्न केला नाही. उलट आमच्या वाट्याचं बिस्कीट कडेवर बसवलेल्या स्वतःच्या लेकराला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला खायला घातलं.  पण इळमाळ निजामाच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगणारे म्हातारे आजूबाजूला असल्याने त्यापेक्षा हे बरं म्हणून आम्ही वनवाश्या दत्तक लेकरांसारखं दिवस काढत होतो. 

जेव्हा पश्चिम महाराष्ट्र तथाकथित जेष्ठ काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली तथाकथित सुसंस्कृत राजकारण आणि समाजकारणाचे धडे आणि पायंडे रचत होता.  तेव्हा, "मी बोलतो रंग्या, तुव्हा बाप" ही अमच्याकडच्या काँग्रेस आमदाराची भाषा होती. तो काळ मराठी शिक्षण घेतलेल्या तरुणांना नेमकं थोडंबहुत कळायला लागलं तेव्हाचा होता. पण वडीलधारी मंडळी रझाकारीमुळं सरकारला घाबरलं पाहीजे या विचारांची असल्याने नव्या पिढीला होईल तितकं दाबत राहिली. 

आणीबाणीनं देशात अनेक नेते घडवले. वाजपेयींचा झंझावात पसरत होता. नवी पिढी थोडी मरगळ झटकायला लागली. त्यात रावसाहेब दानवे नावाचा एक साधारण अशिक्षित शेतकऱ्याचा मुलगा धडपड करत आपलं अस्तित्व निर्माण करत होता. नदीखोऱ्यांच्या आणि बागायती प्रदेशात नेता होणं फार सोप्प आहे. हा तरुण खडकदुष्काळी, माळरान जमिनीवरील लोकांची मोट जोडून पुढे जात होता.

ग्रामपंचायतीपासून सुरवात केलेल्या दानवेंनी "मी बोलतो तुझा बाप" अशी भाषा असणाऱ्या काँग्रेस आमदाराला पराभूत करून आमच्या भोकरदन-जाफराबाद मतदारसंघात लोकांना सत्तेत बदल होऊ शकतो हे पहिल्यांदा दाखवून दिलं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही होती की दानवेंना  घरातून ना आर्थिक सहारा होता ना पाठीशी कुणाचं पाठबळ. घरात भावकीत कोणी दुसरा कोणी मागचे कामं सांभाळणारा कर्तबगार मुत्सद्दी भाऊ होता ना पुतण्या होता. सगळं स्वतःच्या जोरावर सुरू होतं. 

त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेल्या आठवणी आणि घेतलेली मेहनत याचा आमचा तालुक्यातला एक विशिष्ट वयोगट साक्ष होता. जो अल्पशिक्षित आणि राजकारणापासून दूर राहिला. आणि त्या गटातलं सोशल मीडियावर कोणी नाही हे आज दानवेंचं दुर्दैव आहे. 

 दानवे आमच्या गावात पहिल्यांदा मतदान मागायला आले त्यावेळी आमच्या ओट्यावरच सभा झाली होती. तेव्हा त्यांची पॅन्ट म्यानित फाटलेली होती हे वास्तव लोकांनी पाहिलंय. म्हणून काम विकास वगैरे ठीक आहे, पण माज करणाऱ्यांपेक्षा अपल्यासारखा वागणारा, दिसणारा, बोलणारा माणूस म्हणून दानवेंना लोकं निवडणून देत राहिले. 

दानवे आमदार, खासदार होत  राहिले पण त्यांच्या दुर्दैवाने फार कमी वेळा भाजप सत्तेत अली. तेव्हा साधा ग्रामीण दिसणारा, ग्रामीण ढंगात वागणारा हा माणूस गोपीनाथ मुंढे आणि महाजन या मंडळींच्या सावलीत पक्षाशी प्रामाणिक राहिला. काँग्रेसकडून कामं मिळत नव्हती. मिळालेला निधी अपुरा पडत होता. 

दुर्दैवाने पुढे सत्ता आल्यावर त्यांचा आधार असलेल्या गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला. पण तरीही दानवेंनी मराठवाड्याचा नेता म्हणून भाजपमध्ये मजबूत स्थान मिळवलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व बाहेर प्रभावी वाटत नसलं तरी खडसेंसारखे बाजूला होत असताना संघाची परंपरा न पाळणारा हा एकमेव नेता टिच्चून भाजपमध्ये मोठ्या हुद्द्यावर होता आणि आहे.

भाजप सत्तेत होती तेव्हा दानवेंनी भोकरदनसारख्या दुष्काळी भागात सहकारी तत्वावर साखर कारखाना उभा केला. पाणी असणाऱ्या लोकांना ऊस लावायला प्रोत्साहन दिलं. हा २०००-२००१ सालचा घटनाक्रम आहे. विशेष म्हणजे आज तालुक्यात उसाची लागवड कमी झाली पण कारखाना बंद पडून विक्रीला काढण्याची वेळ आलेली नाही. शंभर किलोमीटर दुरून त्यांनी ऊस गोळा केला पण कारखाना बंद पडू दिला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने गिळणाऱ्या नेत्यांसाठी हे एक आदर्श उदाहरण आहे. 

२०१४ला भाजप सरकार आलं तेव्हा मोठ्ठा अनुशेष असलेल्या जालना जिल्ह्यात दानवेंनी कामाचा झपाटा लावला. कोणत्याच सरपंचाला रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही. आपली भागात नेता असल्याशिवाय विकास होत नाही याचं गमक लोकांना कळलं. पक्ष कोणताही असो वापरून घेत ढोपरून सोडत असतो. आज मी भाजपचा वैचारिक विरोधक असलो तरी  भाजप जाण्याने आमच्या विकासाशी तडजोड करण्याची नामुष्की आमच्यावर आली.

दानवेंचा मुलगा आमदार बनण्याआधी मतदारसंघाने सलग दोनदा राष्ट्रवादीच्या आमदाराला संधी दिली होती. पण राष्ट्रवादीवाल्यांनी सत्तेत असूनही कधी मतदारसंघाला फुटकी कवडी फेकून मारली नाही. सर्वात खराब रस्ते राष्ट्रवादीच्या काळातच होते. 

दानवे हे अत्यंत जमीनीवरचा नेता आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान एकदाही कलम ३७० चा उल्लेख न केलेला  भाजपचा तो एकमेव नेता आहे.
गायीच्या नावाने दांभिकपणा करणारी भाजप दानवेंनी मतदारसंघात रुजवलेली नाही. एक स्वतः काम करून रापलेला शेतकरी असल्यानं त्यांना गाय सांभाळायला येणाऱ्या अडचणी माहीत आहेत. त्यामुळेच त्यांचं ते गायीबद्दलचं वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. पण त्यात सच्चेपणा होता. 

महत्वाची गोष्ट म्हणजे देशभर प्रत्येक शहरात caa विरोधात शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. पण एकही भाजप नेता त्या आंदोलनाकडे फिरकला नाही. पण भोकरदन शहरात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनाला त्यांनी आवर्जून भेट दिली. आणि सांगितलं की, "मी पक्षाच्या भूमिकेपुढे जाऊ शकत नाही. पण तुमच्या मतदारसंघाचा नेता आणि तुमचा माणूस म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. तुम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आहात. तुम्हाला माझ्या शुभेच्छा."
 एवढी समज भाजपच्या नेत्यांमध्ये आजकाल क्वचितच दिसून येते. 

 दानवेंना त्यांच्या बोलण्यावरून आणि भाषेवरून ट्रोल केलं जातं. पण ती आमच्या भागाची बोली आहे.साहित्य, चित्रपट हे माध्यमं ती भाषा तुमच्यापर्यंत पोहोचवायला कमी पडले. म्हणून तुम्हाला ती वेगळी किंवा विचित्र वाटते. पण त्यामुळे कितीही ट्रोल केलं तरी ते अंगावर धावून येणारा किंवा आक्रमक होणारा नेता नाही. हे वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे.

दानवेंचा मतदारसंघात संपर्क फार दांडगा आहे. एकदा भेटलेल्या व्यक्तीला ते शेवटपर्यंत नावाने ओळखतात. एवढंच काय दानवेंना काही लोकांच्या बैलांची देखील नावं माहीत असल्याचं बोललं जातं. ग्रामीण भागात लोकांना आणखी काय हवं असतं? लोकांशी मातीशी नाळ जोडून ठेवल्याने ते सातत्याने निवडणून येतायेत. हा दुर्मिळ गुण फक्त पवारांमध्ये आढळतो.  

दानवेंना स्थानिक राजकारणात गमतीने चकवा म्हटल्या जातं. याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि  कित्येकदा लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी भल्याभल्या विरोधकांमध्ये जिंकण्याचा विश्वास निर्माण करून उचलून आपटलं आहे. त्यांनी एकदा असा घुमवून धोबीपछाड दिला की पुन्हा समोरची व्यक्ती त्यांचा नाद करत नाही. याचं उदाहरण म्हणजे काँग्रेसने त्यांच्याविरोधात उभे केलेले उमेदवार पुन्हा दुसऱ्यावेळी तिकीट घेत नाही. 

दानवेंकडे पवार किंवा इतर नेत्यांसारखे कुटुंबातील हुकमी पाठीराखे नाहीत. त्यांचा सर्व डाव एकट्याच्या जीवावर सुरू आहे. अर्जुन खोतकरांसारख्या आक्रमक नेत्याला दानवेंनी 
कित्येकदा गपाणी पाजलंय. आणि अब्दुल सत्तारांसोबत मात्र त्यांची नेहमी चूल जोडून राहिलेली असल्याचं बोललं जातं. ते स्वतःला बारा भोक्षाचा पान्हा का म्हणतात ते तेव्हा कळतं.

आज दानवेंना त्यांच्या रंगावरून लोक चिडवतात. तेव्हा मात्र मला टीकाकारांची फार कीव येते. दानवे हे आमच्या भौगोलिक परिस्थितीत, उष्ण वातावरणात कष्ट करून रापलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. इकडं सगळी माणसं अशीच दिसतात. तो त्यांच्या मेहनतीचा रंग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना साले म्हणण्यावरून केलं गेलेलं ट्रोलिंग. तर त्यांनी जे सांगितलंय की आमच्या बोलीभाषेत रुळलेला तो शब्द आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना खिलाडूवृत्तीनं घेणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. कारण त्यांचा पाठीराखा कार्यकर्ता आणि मतदारसंघातील लोक सोशल मीडियाबाबत एवढे जागृक नाहीत.

राज्यात भाजप सरकार आल्यानं आमच्या मतदारसंघाचा तरी बऱ्यापैकी विकास सुरू झाला होता. पण फडणवीसांना औदसा सुचली आणि आम्ही पुन्हा अनुशेषातच राहिलो.

दानवे चुकीच्या पक्षात नक्कीच आहेत. पण ते स्वतः तितके चुकीचे अजिबात नाही. त्यांचा पक्ष आता काही लोकांच्या हाती गेल्यानं तितका बदनाम झालाय. पण काँग्रेसच्या घातकी आणि बेगडी राजकारणाला पर्याय म्हणून उभे ठाकलेले दानवे हे एक मराठवाड्यातले महत्वाचे शिलेदार होते. त्यांची राजकीय कारकीर्द चर्चेची राहिली तरी त्यांच्याबद्दल मनापासून वाईट बोलण्यासाठी विरोधकांना शब्द कधीच सुचणार नाहीत.

- सोमनाथ कन्नर 
    
                                ***





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महात्मा फुल्यांच्या विचारांचं सामजिक उपयोजन

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं....