बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं....
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं.... गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत. आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारावाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्येक खांद्यांना मरणांतिक कळ लागली असेल. आम्ही त्याच्या बदल्यात माणशी शेरभर ज्वारी दिली आणि मोकळे झालो. आजपर्यंत शाबूत असलेल्या आमच्या डौलदार माड्या आणि तिच्यावरून दिसणारे कुडाचे, छपराचे महारावाडे पाहत आलो. आता आता म...