कट्टरवाद्यांना उरून पुरलेले फुले

महात्मा फुले झोपताना आपल्या बिछान्याखाली दांडपट्टा ठेवत असत. तो काळ दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. बुरसटलेल्या रुढीवादाला अधिकृत पर्यायी व्यवस्था नसताना सनातनी आणि कट्टरतावाद्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकणं धाडसी काम होतं. कारण फुल्यांना अपेक्षित असलेल्या व्यवस्थेचं फळ तोपर्यंत कुणी चाखलेलं नव्हतं. त्यामुळं पाठिंब्याची शक्यता शून्य होती.  पण फुल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अनुनासिक बोलणाऱ्या पुणेरी पगड्यांची कढी पातळ होत होती. ती जरब दाखवली नसती तर फुल्यांवर केव्हाच हराळ उगवली असती. आणि आज आपल्याला लघुशंकेवेळी कानात जानवं गुतवण्याचे वैज्ञानीक फायदे सांगत फिरावं लागलं असतं. 

आज फुलेंच्या किंवा शाहूंच्या विचारांना विरोध करणाऱ्यांची स्वतःची आई, बहीण, मुलगी फुलेंच्या त्यागाचा शिक्षणाद्वारे प्रत्यक्ष फायदा आणि स्वतंत्र उपभोगत आहेत. प्रत्येक समाजाची अन्यायी पुरोहितशाहीतून सुटका झाली आहे. तरीसुद्धा फुलेंच्या विचारांचं वावडं असणं ही केवळ विकृती आहे. कारण विकृतीला नेहमी विवेकाचं वावडं असतं. 

गांधीवादाचा अवाजवी हट्ट धरणाऱ्यांसाठी सांगायचं झालं तर फुलेंना उशीखाली दांडपट्टा बाळगण्याची गरज पडत होती तेव्हा गांधीजींचा जन्मही झाला नव्हता. आणि दुर्दैव असं की गांधीजींच्या दीडशे वर्षांनंतरही हिंसक वृत्ती आणि विकृत बुद्धी असणाऱ्यांचं प्रमाण एक टक्काभरही घटलं नाही. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्यांनी हे दाखवून दिलं आहे. आज येणाऱ्या धमक्याही ते सिद्ध करत असतात.

आजची भारतीय दंड संहिता आणि कायदा तेव्हाही होता. पण केवळ त्या आधारावर ती विकृती तेव्हाही थांबली नाही आणि अजूनही थांबू शकलेली नाही. त्यामुळं केवळ कायद्याच्या आधारावर विकृतीपासून स्वतःचं रक्षण करता येत नाही, हे पटत नसलं तरी कटू सत्य आहे. 

गांधीवाद केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. धार्मिक, सामाजिक शृंखला तोडण्यात गांधीवादाचं उपयोजन केवळ शून्य आहे. सामाजिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा फुलेंचंच बोट धरावं लागेल. त्यासाठी मग फुले मेंदू आणि मनगटासह स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. कारण विवेकवादी चळवळीला प्रत्येकवेळी एक दाभोलकर गमावणं कदापी परवडणारं नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रावसाहेब दानवे... मराठवाड्याच्या मातीशी नाळ जोडलेला नेता..!

महात्मा फुल्यांच्या विचारांचं सामजिक उपयोजन

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं....