महात्मा फुल्यांच्या विचारांचं सामजिक उपयोजन
#महात्मा_फुले_जयंती
#बहुजन_स्त्रिया
#ढोंगी_शुभेच्छूक
वर्तमानपत्रात महिलांचे कर्तृत्व व प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी खास महिला विशेष पुरवण्या असतात. मी त्या पुरवण्या जरूर वाचतो. त्यात विशेष गोखले, परांजपे, लिमये, भिडे आणि तत्सम बिरादरी असलेली आडनावे वाचायला मिळतात. आणि पुढं कंसात अमेरिकेहून, लंडनवरून, ऑस्ट्रेलियाहून आशा देशातील त्यांचा पत्ता दिलेला असतो.
अशा पुरवण्या वाचताना माझं त्या अडनावांवर आणि देशांवर बारीक लक्ष असतं. का कुणास ठाऊक मला त्या नावांमध्ये काहीतरी वेगळं अपेक्षित असतं. पण माझा नेहमीच हिरमोड होतो.
फुले जयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये वरील आडनावे असलेल्यांच्या भावकीतलं किंवा नात्यातलं फारसं कोणीच आढळून येत नाही. आणि असलं तरी त्यांनीच त्या शुभेच्छा देणं खरं अभिवादन ठरेल. बाकी बहुजनांची फक्त औपचारिकता आहे. ढोंग आहे.
कारण महात्मा फुलेंचं समग्र साहित्य आणि विचार वाचल्यास असं लक्षात येतं की त्यांनी वरील आडनावे असलेल्या वर्गाने राबवलेल्या कर्मठ विचारांना लक्ष्य केलं होतं. पण परिस्थितीचा विरोधाभास बघा. आज त्याच वर्गातील महिला शैक्षणिक क्षेत्रात पुढारलेल्या आहेत. याउलट महात्मा फुले ज्या कुणबी किंवा मागास समजल्या जाणाऱ्या समाजातील जनतेसाठी विशेषतः महिलांसाठी लढले त्या समाजाने फुलेंना एकोणिसाव्या शतकातच ठेवलं. गोखल्यांची वैदेही, गार्गी, भार्गवी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करून जर्मन भाषा शिकण्यासाठी अर्ज करते तेव्हा शिंद्यांची, भोसल्यांची, पाटलाची, पवाराची छकुली, बबडी आणि पिंकी होलसेल दुकानात लग्नाचा बस्ता फाडत असते किंवा सासूबाईबरोबर गर्भतपासणीसाठी दवाखान्यात अलेली असते.
वरील आडनावांच्या तुलनेत बघितल्यास आज किती बहुजन समाजातल्या स्त्रियाना मनसोक्त शिकवलं जात? किती महिला समाजात आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात? बराच विचार केल्यास उत्तर फार नगण्य आकड्यांत येईल. दहावी-बारावी किंवा जास्तीत जास्त पदवीपर्यँत शिकवलं की बहुजनांना पोरी घशात अडकलेलं हाडुक वाटतात. कधी एकदा यांना उजवतो अन मोकळं होतो ही बहुतेकांची धडपड आहे.
सर्वात कमी शिक्षण झालेल्या व आजही चूल आणि मूल याच पठडीत जगणाऱ्या स्त्रिया फुलेंच्याच जातसमूहातील व वर्गातील आहेत. या स्त्रियांना स्वतःचं मतही नाही. पिठाचे भरलेले हात पुसून ग्रामपंचायतीच्या ठरावावर सही करण्यापुरतं गावात त्यांचं मानाचं स्थान आहे. किंवा नगराध्यक्ष आणि महापौर जरी झाल्या तरी चोपून चापून नेसलेली साडी गळ्यात लोम्बणारे मोठमोठे पेंडेंटचे मंगळसूत्र याशिवाय त्यांची कवडीचीही ओळख दुसऱ्या पंचवार्षिकला उरत नाही. महिला आरक्षण नसतं तर तेवढंही दिसलं नसतं.
कमी वयात संसाराचे जू मानेवर घेणाऱ्या आणि कोवळ्या वयातच लेकरं छातीशी धरून पाजणाऱ्या स्त्रिया फुलेंच्याच वर्गातील आहेत. देवधर्म करत अंधश्रद्धाळू बनलेल्या स्त्रिया फुलेंच्याच वर्गातील आहेत. ज्या महिलांना शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी लोकांनी मारलेले शेणाचे, घाणीचे गोळे अंगावर झेलले त्या स्त्रिया वाचनं-लिहिणं शिकून त्याचा उपयोग अथर्वशीर्षपठण, सोळा गुरुवार अन सत्तावीस मंगळवारांचं महत्व सांगणारी पोथी वाचण्यासाठी करतायेत. एकूणच काय तर हे सगळं बघून फुलेंच्याही डोक्याला मुंग्या याव्यात, अशी आजची परिस्थिती आहे. फुल्यांना व्यवस्थित थप्पीला लावून हा अर्धवट शिक्षित कच्चा माल रामतीर्थकार सारख्यांनी सनातन धर्माच्या नादी लावला आहे. याला आतापर्यंतच्या बहुजन नेत्यांची आंधळी दुरदृष्टीही कारणीभूत आहे.
पुरुषांनी धर्मससत्ता आणि कर्मकांडांना जुमाननं बंद केलं किंवा धर्माला व्यवहारिक दृष्टीने पाहायला सुरुवात केल्यानं मृतावस्थेत जात असलेल्या या प्रथांना साक्षर महिलांनी आपल्या खांद्यावर घेतलं. आज धर्माची, अंधश्रद्धांची पालखी वाहण्यात महिलांचं फार मोठं योगदान आहे. महत्त्वाचं असं की स्त्री बरोबरीत आली तर अडचण होईल आणि अंघोळीनंतर हातात टॉवेल, अंडरवेअर-बनियन आणि चहा मिळणार नाही म्हणून बवचाळून गेलेल्या बहुजन पुरुषाला ती कर्मकांडात गुंतलेली जास्त फायद्याची वाटते. ही खरी मेख आहे.
दागिन्यांचे डिझाइन, साड्यांचे काठ आणि पदरावर असलेलं नक्षीकाम, सणासुदीचे पदार्थ, नवऱ्याचा आणि लेकरांच्य कर्तृत्वाच्या फुशारक्या आणि पुढारलेल्या स्त्रियांच्या कुचाळक्या करत आपला खानदानीपणा मिरवणे याशिवाय बहुतांश बहुजन महिला आणि मुलींच्या चर्चा पूर्ण होत नाहीत.
आज दिवसभर महात्मा फुलेंच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम त्यांच्याच दळभद्री बहुजन समाजाने पुरेपुर केलं. त्या ढोंगीबगळ्या समाजात मीही येतो.
माझ्या ढोंगी समाजाच्या वतीनं माझ्याकडूनही खोटं खोटं अभिवादन...!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा