मराठवड्याची शोकांतिका: तिथं जन्माला नं आलेला एकही कर्मवीर भाऊराव पाटील

आमच्या मारठवाड्यातही ढिगाने पाटील झालेत. निजामशाहीतही आमच्या गढ्या अन वाडे शाबूत राहिले. पण कुणी भाऊराव पाटील निपजला नाही. ही आमची क्रूर शोकांतिका आहे. 

वेरूळ अजिंठ्यासारख्या कलाकृती असो की इतर कोणताही पुरातन ठेवा त्याच्या नखाचीही सर कुठल्याही राजवटीला, संस्कृतीला नाही. मराठी संस्कृतीचा इतिहास मारठवाड्याभोवतीच घुटमळतो. इतर महाराष्ट्र हा त्या संस्कृतीभोवतीचं प्रभावीत क्षेत्र आहे. पण या मराठी संस्कृतीला शाप आहे. इथं आसऱ्याला आलेला प्रत्येकजण मोठा होतो. अन त्याच वेगात या संस्कृतीची कूस वांझोटी होत जाते. 

मारठवाड्यातले भग्न वाडे आणि चिरेबंदी गढ्या पहिल्या तरी इतर इथल्या मराठी संस्कृतीचा वैभवशाली इतिहास तुम्हाला दिसेल. पण हे सगळे भग्नावशेष आज त्या संस्कृतीच्या कर्तृत्ववान पिढ्यांबाबतच्या वांझोटेपणाची कबुली आहे.

आम्हीही पाहिलेत कित्येक जरीपटका बांधलेले अक्कडबाज पाटील, त्यांच्या तिवसाच्या दमनीला पितळाचा मुलामा आणि तिला जुंपलेले तालीमबंध कदम चालीत चालणारे रंगी-शिंगी हरणचनी बैल. पांढऱ्याशिपित आडदंड घोड्यांच्या नक्षीदार कातडी जिनांवर  मांड ठोकून हातात रेशमी लगाम धरून फेरफटका मारणारे रुबाबदार पाटील.
आम्ही पहिल्या महिरपी कमानी आलेल्या माड्या, अनुकुचीदार खिळे ठोकलेले अवाढव्य दरवाजे, बैठकीत बसलेले कानात तोळा तोळा बाळ्या, बोटात पिवळ्याधम्मक अंगठ्या, शुभ्र तलम धोतरं, हातात पितळी शेम्ब्या ठोकलेले बाकदार वेत, पायात कर्रकर्र वाजणारे बांधीव पैठणी खेटरं घालून  मिरवणारे पाटील, आम्ही पाहिल्या चिरेबंदी विहिरी अन त्यावर चालणाऱ्या मोटा, नजर जाईल तिथपर्यंत जमिनी. आता आता दवनीय वाटत असलो तरी हे सगळं वैभव पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे आधीच फिटलेले आहेत. 

आम्हाला अशा कित्येक गोष्टींचं कौतुक वाटत असलं तरी भाऊराव पाटलासारखा कोणी वैरागी कर्मवीर पाटील आमच्या भूमीत निपजला नाही याचं शल्य आम्हाला आमच्या गुलछबू इतिहासातून बाहेर आणतं. नियतीने एकअर्धा तसा पाटीलही या भूमीच्या पदरात टाकला असता तर आज आमच्या मारठवाड्याच्या पुढच्या पिढ्यांवर पुण्या-मुंबईच्या दावणी झाडायची वेळ आली नसती. 

कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिवादन..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रावसाहेब दानवे... मराठवाड्याच्या मातीशी नाळ जोडलेला नेता..!

महात्मा फुल्यांच्या विचारांचं सामजिक उपयोजन

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं....